Beyond Yourself

  गतवर्षी दसऱ्याला स्थापन झालेल्या Beyond Mountains या संस्थेचा ‘Beyond Yourself ‘ ह्या नवीन प्रकल्पाची सुरुवात या वर्षी २ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली.फक्त नोकरी करत उदरं भरणं एवढेच स्वतः:च्या आयुष्याचे उद्दिष्ट न ठेवता काहीतरी जगावेगळे धाडस करून दाखविण्याची इच्छा मनात बाळगून स्वतःची आवड जपत इतरांनाही या धाडसी मोहिमांत सामावून घेणे या उद्देशाने काही समविचारी मित्रमंडळींचा कट्टा जमून गेला आणि ‘Beyond Mountains’ चा उदय झाला. “All it takes is Courage” या ब्रिदवाक्याला धरून गिर्यारोहणाच्या सोबतीने सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खेळत, अवघड वाटांशी जुळवून घेत, प्रत्येकाला निसर्गनिर्मित आविष्कारांचे दर्शन घडवीत आणि आपल्या सुप्त मनातला मीपणा नष्ट करत, धैर्य, साहस व अनुभव ही सूत्रे वापरून Beyond Mountains ची वाटचाल सुरु आहे.

         Beyond Yourself, स्वतःच्या अंत:मनात डोकावून स्वतःच्या पलीकडे जाऊन स्वतःशी संबंधित इतर घटकांच्या कल्याणाचा विचार रुजविणे आणि इथल्या निसर्गाशी आणि समाजाशी जोडलेली नाळ अधिक दृढ करणे या उद्देशाला अनुसरून Beyond Mountains नी उचललेलं हे पहिलं पाऊल. म्हंटलं तर अवघड आणि म्हणलं तर अगदी सोपं. ग्राम शिक्षण , ग्राम आरोग्य, ग्राम विकास आणि ग्राम सुरक्षा या उद्दिष्टांसाठी बांधील असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावामध्ये ‘तोरणा राजगड समाजजोन्नती न्यास’ या सेवा प्रकल्पाला भेट देऊन या वसतिगृहातील पन्नास मुलांशी थेट संवाद साधून मुलांच्याच मदतीने एक अभिनव उपक्रम संपन्न झाला. आपल्या उद्दिष्टांसाठी गेली तीस वर्षे अविरतपणे झटणाऱ्या या संस्थेच्या वाटचालीत खारीचा वाटा उचलण्याची संधी Beyond Mountains ला मिळाली.

          ‘संस्कार’ हे केवळ धार्मिक मूल्यांवर आधारित न राहता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थिती विश्लेषणावरून मुलांमध्ये घडवून आणणे हे अधिक फायदेशीर ठरते. या विचारानी सर्व मुलांसमोर ‘निसर्ग संवर्धन’ हा आयत्यावेळचा विषय सर्व मुलांसमोर मांडण्यात आला. या विषयाचा आवाका लक्षात येण्यासाठी विषय मांडणी करताना निसर्गाचे सध्याचे स्वरूप आणि सद्य स्थितीत त्याचा होत असलेला ऱ्हास दर्शविणारे व्हिडीओ चित्रीकरणही दाखविण्यात आले. उद्देश फक्त हाच कि जास्तीत जास्त खोलवर या विषयाचे गांभीर्य निर्माण व्हावे आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव व त्यासाठीचे उपाय मुलांच्या डोक्यात आणि डोळ्यांसमोर दृश्यमान व्हावेत. सहा-सहा मुलांचे आठ गट करून प्रत्येक गटांनी निसर्ग संवर्धन या विषयी जे काही आकलन आणि उपाय, कल्पना सुचतील ते प्रत्येक गटाला दिलेल्या कार्ड शीट वर उतारावावेत अशी संकल्पना सगळ्यांसमोर मांडण्यात आली. त्यानुसार पेपर्स, स्केच पेन्स, रंगीत खडू प्रत्येक गटाला पुरविण्यात आले. पुढील तीस मिनिटे सर्व मुले कामाला लागली. सोबतीला आमच्या संस्थेचे स्वयंसेवक आपापली कामगिरी बजावीत होतेच…. आणि मग आम्हा सगळ्यांना पाहायला मिळाला तो निरागस अंतःकरणातून कागदावर उमटलेला एक अनोखा कल्पनाविष्कार! मुलांच्या डोक्यातून निघालेल्या भन्नाट आयडिया पाहून तर आम्ही चकितच झालो. एकीकडे निरनिराळ्या रंगसंगतीने चितारलेला अनोखा निसर्ग, वसुंधरेचे सुंदर रूप दर्शवित होता तर दुसरीकडे याच वसुंधरेला पोखरणारा प्रदूषणाचा विळखा मन अस्वस्थ करीत होता. कुणाच्या पोस्टरवर पृथ्वीवर करोडो वर्षांपासून निर्माण झालेल्या साधनसंपत्तीची मोजदाद मांडली होती तर कुणाकडे ह्याच संपत्तीच्या लुटारूंचा पंचनामा मांडला होता. कुणाच्या कागदावर मुक्या जीवांची हाक उमटली होती तर कुणी कागदावर संवर्धनाचा आलेख दर्शविला होता. पोस्टर मेकिंग पूर्ण झाल्यावर प्रत्येक गटालाच आपण काय बनविले आहे याचे सादरीकरण करायला लावले. त्यातूनच निसर्ग संवर्धनासाठीचे उपाय त्यातील समस्या याचे विश्लेषण केले गेले. ह्या सगळ्या प्रकल्पातून दिसून आले ते नवीन काही शिकण्यासाठीचा मुलांमधील उत्साह, गटचर्चांमधून अस्तित्वात आलेल्या त्यांच्या भन्नाट डोक्यातील कल्पना, त्याचे धडाकेबाज सादरीकरण. त्यानंतर उलगडली ती आपण आखून दिलेल्या उद्देशाची, मनांवर खोलवर रुजत जाणारी,स्वतःच्या पलीकडची मूर्त स्वरूपातील एका अनोख्या जबाबदारीची जाणीव.एक माणूस म्हणून हि जाणीव सदैव अंत:करणात तेवत राहील याची जबाबदारी प्रत्येकावर असेल. संपूर्ण उपक्रम संपल्यावर समाजाच्या संवेदनशील स्तरात मोडणाऱ्या या मुलांना Beyond Mountains च्याच सहभागी स्वयंसेवकांच्या हस्ते प्रत्येकाला कृतज्ञता म्हणून दिवाळीसाठी नवीन ‘ट्रॅक सूट्स’ वाटण्यात आले. या दरम्यान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद लपु शकत नव्हता. 

गिर्यारोहणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकालाच निसर्गाबरोबरच या निसर्गाच्या कुशीत वाढणाऱ्या प्रत्येक जीवाशी एकरूप होण्याची संधी यातून निर्माण होईल आणि इथल्या समाजाशी असलेले अतूट नाते अश्या उपक्रमांमधून जोपासले जाईल याच भावनेनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या सगळ्यातून प्रत्येकात स्वतःपलीकडे पाहून एका सामाजिक जबाबदारीची जाणीव जरी निर्माण झाली तरी ‘Beyond Yourself’ चा उद्देश मार्गी लागला असे मी म्हणू शकेन.

विशेष आभार:

तोरणा राजगड समाजोन्नती न्यास या संस्थेचे सर्व पदाधिकारी,

सहसचिव, श्री रमेश आंबेकर.

सर्व Beyond Mountains संस्थेचे कार्यकर्ते आणि सदस्य.

– समीर दिवेकर

Beyond Mountains

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top