परवाच आमचा परिचयाच्या व्यक्तीचा मला फोन आला आणि पुन्हा देवकुंड इव्हेंट केव्हा करणार आहात अशी चौकशी झाली. यापूर्वीच्या देवकुंड ट्रेकला हा मनुष्य आला होता. आणि मला चटकन पावसाळ्यापूर्वी नेलेल्या देवकुंड ट्रेकचा किस्सा डोळ्यासमोर उभा राहिला. अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे ताम्हिणी डोंगर श्रेणीत देवकुंडला हाहाकार माजला होता. उत्साहाच्या भरात बरेच हौशी पर्यटक तुडुंब वाहणाऱ्या ओढ्यांच्या किनाऱ्यावर अडकले होते. सुमारे साठ सत्तर जणांना आम्हीच स्वतः रेस्क्यू करून भिऱ्याला घेऊन आलेलो. आमच्यावरच्या विश्वासाने हा गृहस्थ पुन्हा एकदा माझ्याकडे देवकुंडचीच चौकशी करत होता.
वास्तविक या पावसाळ्यात देवकुंड आणि तश्याच प्रकारच्या अनेक बातम्यांना, चर्चांना आणि आपापसातील मतभेदांना उधाण आले होते.. कोणी देवकुंड मध्ये गेला तर कोणी विकटगडावरुन पडला..कोणी आंबोलीला घाटातून दारू पिऊन दरीत कोसळला तर कुणी माळशेजला. एकसारख्या बातम्यांनी टीव्ही, पेपर, सोशल मीडिया झळाळत होते. फक्त दारू पिऊन धिंगाणा करण्यासाठीच पावसाळी सहलीला हि थिल्लर पार्टी येते आणि ह्याचाही दोष ट्रेकिंग संस्थांना दिला गेला. त्यानंतर या सगळ्याचे ‘रूट कॉझ’ विश्लेषण सुरु झाले. कुणी बेजाबदार ट्रेकर्स कडे बोट दाखवत होता तर कुणी ट्रेक संस्थेला. त्यात आजकाल कोणीही पिकनिकवाले ट्रेकला येऊन गर्दी करतात आणि केवळ पैसाच कमविण्यासाठी गल्लोगल्ली अश्या संस्था उभ्या राहिल्या आहेत अशी बोंबाबोंब सुरु झाली .अजून खोलात जाऊन हल्लीच्या पिढीची बेफिकिरी वृत्ती, खिशात कमी वयात खळखळणारा खूप जास्त पैसा, व्यसनाधीनता आणि त्यांनी होणारे अपघात , ट्रेक म्हणजे पिकनिक नव्हे इथपर्यंत चर्चा रंगल्या. यात जाणते हाडाचे गिर्यारोहक म्हणवणाऱ्या काही लोकांनी तर “चायला आमच्या वेळी हे असलं नव्हतं” या चालीवर कुठलीही सखोल चौकशी न करता सरसकट हल्लीच्या पिढीवर आणि ट्रेकिंग संस्थांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. आयटी क्षेत्रातुन आणि इतर तत्सम क्षेत्रांमधून मिळणाऱ्या पैश्यामुळे हल्लीची पिढी ट्रेकची मज्जा घालवून त्याची पिकनिक करू लागली आहे आणि अश्या लोकांकडूनच पैसे उकळून कुठल्याही संधीसाधू संस्था ट्रेक्स आयोजित करतात अशी कुठलीही संदर्भहीन बोंब मारायला लागले.
वास्तविक काही जणांच्या चुकीला अथवा काही जणांकडून होणाऱ्या चुकीच्या व्यवस्थापनाला सरसकट सगळ्यांनाच दोष देणे आणि तरुण पिढीला धारेवर धरणे हे कितपत योग्य आहे या गोष्टींचा या जाणकारांनी वेध घ्यावा असे मला वाटते. नुसतेच आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जे काही घडत आहे ते होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांची ट्रेकिंगसाठी असलेली ‘पिकनिक मेन्टयालीटी’ घालवून त्यांना खऱ्याखुऱ्या ‘ट्रेकर्स मेन्टयालीटीत’ आणण्यासाठी आणि त्यातून खराखुरा निसर्गासक्त गिर्यारोहक घडविण्यासाठी काय करता येऊ शकते याचा विचार करणे जास्त योग्य ठरेल.आपण जे इतके वर्ष ट्रेक्स करून जी सकारात्मक ऊर्जा आत्मसात केलेय, ज्या निसर्गाच्या शाळेत भटकून आपली स्वतःची जडणघडण झालेय ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवण्यापेक्षा आणि उगाचच पूर्वीसारखे खरे गिर्यारोहक राहिले नाहीत अशी आवई उठवण्यापेक्षा सिस्टिम मधील दोष काढून ती बदलविण्यात अश्या लोकांनी पुढाकार घेतल्यास आपली ‘ट्रेकर्स मेन्टयालीटी’ लोकांमध्ये रुजविण्यास नक्कीच मदत होईल. आज अनेक जुन्या आणि नविनही संस्था आहेत ज्या असा बदल घडविण्यासाठी यथार्थपणे या कार्यात हातभार लावत आहेत. संपूर्ण ट्रेकमध्ये दारूबंदी, कुठेही कुणाला कचरा टाकू न देणे, निसर्गाशी जवळीक साधून या मुलुखातल्या शौर्याची आणि इतिहासाची ओळख करून देऊन येणाऱ्या ट्रेकर्सच्या नवीन पिढीला त्या ठिकाणच्या समाजाशी एकरूप करून घेण्यासाठी पुढाकार घेणे या आणि अशासारख्या बऱ्याच कार्यात योगदान सुरु आहे. आज खरोखर दुदैव म्हणायला लागेल कि महाराष्ट्रात एवढा समृद्ध सह्याद्री असूनही आपल्या इथे ‘पर्यटन’ हवे तितके वाढीस लागले नाहीये. खरं तर या मेक इन इंडिया च्या स्वप्नामध्ये एखादी तरुण पिढी स्वकर्तुत्वानी काही सकारात्मक बदल घडवू इच्छित असेल आणि शाश्वत पर्यटन विकासाला हातभार लावत असेल तर त्यांचे स्वागतच व्हायला हवे अर्थात ते तितकेच नैतिक आणि जबाबदार असणे गरजेचे आहे. या सगळ्यासाठी तितक्याच कळकळीनी आणि जबाबदारीने जर का ते सेवा देऊन शुल्क आकारात असतील तर त्यात काही चूक आहे असही वाटत नाही. मुद्दा चुकीच्या गोष्टींना आळा घालणे आणि खऱ्या अर्थानी गिर्यारोहण हा खेळ आपल्या इथे रुजविणे हाच असू द्यावा. काही बेशरम आणि असंवेदनशील लोकांमुळे गडांवर आणि घाटांमध्ये दारू पिऊन जो नंगा नाच चालवलेला असतो अश्या स्वयं आयोजित ‘पिकनिकी ट्रेकर्सना’ लगाम घालणे हि खरोखर काळाची गरज आहे. किमान हि जागरूकता निर्माण करण्याचे काम जुने जाणते ट्रेकर आणि एखादी योग्य संस्थाच चांगले करू शकते. वेळप्रसंगी एकमेकांसाठी एकत्र येऊन या कामी हातभार लावण्यातच खरं ‘ट्रेकर्सपण’ आहे. पण अश्या बेफिकीर लोकांच्या जाचाला कंटाळून ‘आम्ही तर आता वीकेंडला ट्रेकिंग करणे सोडलंय’, अशाही प्रतिक्रिया होत्या. असच वागायचं ठरवलं तर एक काळ असा येईल कि गडांवर फक्त ‘पिकनिकवालेच’ दिसतील. अशा लोकांसाठी सर्वानाच दोषी ठरवून पुन्हा एकदा “च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं ” एवढंच पालुपद म्हणून आणि उगाचच जबाबदारी झटकून हे प्रश्न सुटतील असे वाटत नाही आणि या सगळ्यांना विरोध न करता शांत बसून सह्याद्रीत शांतता नांदेल अशीही शक्यता नाही. गरज आहे ते सर्वांनी एकत्र येऊन बदल घडविण्याची. चांगले लोक गप्पं बसतात म्हणूनच अश्या लोकांचं फोफावतं. कदाचित खऱ्या गिर्यारोहकांनी आपली जबाबदारी न झटकता ती ओळखून एकत्र येऊन व्यक्तिशः किंवा आपापल्या संस्थांमार्फत प्रबोधन करण्याची गरज आहे. नुसते प्रबोधन नाहीच तर जिथे ज्या चुकीच्या गोष्टी होतात तेथे विरोध दर्शविणे हेही तितकेच महत्वाचे ठरेल.
– समीर दिवेकर