गेल्या दोन अडीच वर्षात Beyond Mountains च्या निरनिराळ्या कार्यक्रमातून खूप लोकांशी जिव्हाळ्याचं नातं जडून गेलं. निसर्गामध्येच नेऊन निसर्गाकडून शिकलेल्या गोष्टी इतरांनी अनुभवाव्यात यासाठी दऱ्याखोऱ्यात फिरून निर्माण होणाऱ्या साहसाचा, धाडसी प्रवृत्तीचा आणि त्यातून मिळणाऱ्या असीम आनंदाचा व्यक्तिगत अनुभव प्रत्येकाला मिळावा या ध्येयानी आमचे प्रत्येक कार्यक्रम घडून येतात. या सगळ्यात निसर्गाकडून, समाजाकडून जेवढं काही घेतलय त्याची संस्थेचा ‘Beyond Yourself’ या उपक्रमातून कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून परतफेड होतच राहते.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसातून घरी आल्यावर पुढच्या तिमाही ट्रेकचे आराखडे करण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात माझ्या शाखेतल्या शिक्षकांचा फोन आला. दर वर्षीप्रमाणे यावर्षी भरणारे आपल्या शाखेचे श्रमसंस्कार शिबीर पोमगांव या ठिकाणी होणार आहे अशी माहिती देऊन, गावात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पाणी आडवणाऱ्या बंधाऱ्याची बांधणी व दुरुस्ती, शिवाय त्यासाठी येणारा खर्च, श्रम आणि फलनिष्पत्ती या बाबतची सविस्तर माहिती एका दमात शिक्षकांनी सांगितली. वर पूर्णवेळ शिबिराला उपस्थित राहण्याचाही आग्रह करत होते. माझ्या डोळ्यासमोर काही वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातल्या भादस गावी केलेल्या श्रमदानाची आठवण झाली. कुदळ, फावडी, घमेली घेऊन ३ दिवस आम्ही शाखेतले तरुण उन्हाची पर्वा न करता दुष्काळाशी दोन हात करत गावकऱ्यांसाठी बंधारा उभारण्याच्या कामात राबलो होतो. आज कित्येक दिवसांनी तशीच संधी पुन्हा चालून आली होती पण नेमका मी त्या कालावधीत दुसऱ्या एका कार्यक्रमानिमित्त परगावी असल्याने श्रमसंस्कार शिबीरास उपस्थित राहणं शक्य नव्हतं. हि अडचण सांगितल्यानंतर शिक्षकांनी लगेच दुसरा प्रश्न समोर केला. “तुला जमणार नसेल तर श्रमदानासाठी येणार थोडा खर्च तू उचलशील का? ” असं विचारल्यावर मला एकदम ध्यानात आले. आज खूप दिवस झाले उत्सवा व्यतिरिक्त शाखेत जाणे होत नाही. Beyond Mountains सुरु केल्यापासून तर प्रत्येक शनिवार रविवारही या व्यक्तिगत ध्येयासाठी खर्च पडतो. आणि अश्या कामांसाठी वेळेचं गणित जमत नाही. ज्या शाखेनी आम्हाला घडवलं, समाजाला घडवलं त्याच समाजासाठी श्रमदानाच्या उपक्रमातून काहीतरी निराळं करून दाखवण्याची एक संधी चालून आली होती.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येत राहावेत जेव्हा स्वतःला कोणते ना कोणते ऋण फेडण्याची संधी आपण होऊन चालून यावी. जेव्हा कुठल्यातरी गोष्टीसाठी ‘ऋणी’ असणे हि एक जाणीव मनात बनते, या जाणिवेमुळे आपण स्वतः किती व्यक्तिगत लाभात आहोत हे कळून येते. स्वतःमधे दुसऱ्यांबद्दलचा कृतज्ञता भाव मनात जागा राहतो. आपण इथल्या मातीशी, समाजाशी, देशाशी आणि सर्वार्थाने या निसर्गाशी किती घनिष्ठ संबंध ठेऊन आहोत याची आपोआप जाणीव होत राहते आणि नकळात आपले पाय जमिनीवर घट्ट राहतात. आज आपण निरनिराळ्या क्षेत्रात स्वतःच्या कामात कर्तबगारी दाखवून जातो पण ती निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टीमुळे अंतरंगातून जडणघडण होत गेलेय, त्या गोष्टींशी आपण आजन्म ऋणी असणे यातच आपली विनम्रता टिकून राहील. लहानपणापासून पाठीवर पडणारी एखादी थापही नकळत चांगला विचार घडवून जाते आणि विचार घडवणारा तो क्षण आयुष्यभर आपल्या डोक्यात पक्का बसून आपण त्याबद्दल कायमचे कृतज्ञ राहतो. अश्याच एका माणूस घडविण्याच्या फॅक्टरीत मी एके संध्याकाळी दाखल झालो आणि शाळेत असल्यापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत याच फॅक्टरीत काम करत राहिलो. रोजच्या एक तास शाखेत सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, प्रहार, नियुद्ध, समता यांनी जशी शरीराची घडण झाली तशी पद्य, साहसकथा, बौद्धिके, प्रार्थना यांसारख्या संस्कारानी मनाची घडण पक्की झाली. आज जगात कुठेहि असलो तरी घडून आलेले हे संस्कार दैनंदिन जीवनातही चुणूक दाखवून जातात.आजच्या घडीला व्यक्तिनिर्माण करणारं, व्यवस्थापनाचे चोख धडे देणारं, इथल्या मातीशी निष्ठा जपणारं जगातील उत्कृष्ठ स्रोत म्हणजे संघ शाखाच ठरेल. आज याच शाखेच्या माध्यमातून श्रमदानासाठी अनेक तरुण सरसावले आहेत. उन्हाळ्यात उद्भवणारा पाण्याचा प्रश्न निदान महाराष्ट्राला तरी नवीन नाही. आपल्यापरिनी गावातला पाणीप्रश्न कसा सुटेल यासाठी प्रत्यक्ष मुळाशी जाऊन कामात उतरणे आणि त्यायोगे श्रमसंस्कार घडविणे यासाठी शिबिराचे महत्व चटकन माझ्या ध्यानात आले.
या सगळया विचारांमधून जेव्हा मी बाहेर आलो तोपर्यंत नकळत मी एक चेक फाडला होता. माझ्या बरोबरीने काम करणाऱ्या संस्थेमधल्या इतर साथीदारांचीही याला मान्यता होती. खरोखर समविचारी लोक आपल्या बरोबरीने असणे किती गरजेचे असते. आज प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होता आलं नाही तरी त्यासाठी येणारा खर्च आपण देयचा असा सर्वानुमते ठरले. आज इतक्या भटकंतीतून खूप काही शिकायला मिळालय. इथल्या निसर्गाकडून, इथल्या मातीतल्या माणसांकडून, प्राणी-पक्ष्यांकडून काही ना काही घेतच आलोय. विंदांच्या कवितेप्रमाणे
‘देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे.’
यानुसार देणारे देत जातात आणि घेणारे घेत राहतात. आज मी देणाऱ्याच्या जागेवर उभा आहे. आज प्रत्यक्ष स्वतःचा वेळ देऊ शकलो नाही तरी या संस्थेमधून काहीतरी देण्याची तयारी झाली आहे एवढंच काय ते समाधान. Beyond Mountains च्या माध्यमातून आम्ही समाजातील सर्व स्तरातील लोकांना आमच्या सोबतीला घेऊन सह्याद्री आणि हिमालयाच्या राकट दऱ्याखोऱ्यांची सफर घडवून आणतो. जाणीव पूर्वक इथल्या इतिहासाची, संस्कृतीची ओळख करून देतो. गिर्यारोहणाबरोबरच त्यायोगे येणाऱ्या सर्व साहसी खेळांचा अनुभव करून देतो. आज हे सगळं मॅनेज करताना या मॅनेजमेंटचे धडे जिथून घडविले त्याच्यासाठी केलेला हा अल्पसा ऋणनिर्देश.
© समीर दिवेकर
Beyond Mountains