Author name: admin

Blog

च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं…

  परवाच आमचा परिचयाच्या व्यक्तीचा मला फोन आला आणि पुन्हा देवकुंड इव्हेंट केव्हा करणार आहात अशी चौकशी झाली. यापूर्वीच्या देवकुंड ट्रेकला हा मनुष्य आला होता. आणि मला चटकन पावसाळ्यापूर्वी नेलेल्या देवकुंड ट्रेकचा किस्सा डोळ्यासमोर उभा राहिला. अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे ताम्हिणी डोंगर श्रेणीत देवकुंडला हाहाकार माजला होता. उत्साहाच्या भरात बरेच हौशी पर्यटक तुडुंब वाहणाऱ्या ओढ्यांच्या किनाऱ्यावर अडकले होते. सुमारे साठ सत्तर जणांना आम्हीच स्वतः रेस्क्यू करून भिऱ्याला घेऊन आलेलो. आमच्यावरच्या विश्वासाने हा गृहस्थ पुन्हा एकदा माझ्याकडे देवकुंडचीच चौकशी करत होता.  वास्तविक या पावसाळ्यात देवकुंड आणि तश्याच प्रकारच्या अनेक बातम्यांना, चर्चांना आणि आपापसातील मतभेदांना उधाण आले होते.. कोणी देवकुंड मध्ये गेला तर कोणी विकटगडावरुन पडला..कोणी आंबोलीला घाटातून दारू पिऊन दरीत कोसळला तर कुणी माळशेजला. एकसारख्या बातम्यांनी टीव्ही, पेपर, सोशल मीडिया झळाळत होते. फक्त दारू पिऊन धिंगाणा करण्यासाठीच पावसाळी सहलीला हि थिल्लर पार्टी येते आणि ह्याचाही दोष ट्रेकिंग संस्थांना दिला गेला.  त्यानंतर या सगळ्याचे ‘रूट कॉझ’ विश्लेषण सुरु झाले. कुणी बेजाबदार ट्रेकर्स कडे बोट दाखवत होता तर कुणी ट्रेक संस्थेला. त्यात आजकाल कोणीही पिकनिकवाले ट्रेकला येऊन गर्दी करतात आणि केवळ पैसाच कमविण्यासाठी गल्लोगल्ली अश्या संस्था उभ्या राहिल्या आहेत अशी बोंबाबोंब सुरु झाली .अजून खोलात जाऊन हल्लीच्या पिढीची बेफिकिरी वृत्ती, खिशात कमी वयात खळखळणारा खूप जास्त पैसा, व्यसनाधीनता आणि त्यांनी होणारे अपघात , ट्रेक म्हणजे पिकनिक नव्हे इथपर्यंत चर्चा रंगल्या. यात जाणते हाडाचे गिर्यारोहक म्हणवणाऱ्या काही लोकांनी तर “चायला आमच्या वेळी हे असलं नव्हतं”  या चालीवर कुठलीही सखोल चौकशी न करता सरसकट हल्लीच्या पिढीवर आणि ट्रेकिंग संस्थांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. आयटी क्षेत्रातुन आणि इतर तत्सम क्षेत्रांमधून मिळणाऱ्या पैश्यामुळे हल्लीची पिढी ट्रेकची मज्जा घालवून त्याची पिकनिक करू लागली आहे आणि अश्या लोकांकडूनच पैसे उकळून कुठल्याही संधीसाधू संस्था ट्रेक्स आयोजित करतात अशी कुठलीही संदर्भहीन बोंब मारायला लागले.  वास्तविक काही जणांच्या चुकीला अथवा काही जणांकडून होणाऱ्या चुकीच्या व्यवस्थापनाला सरसकट सगळ्यांनाच दोष देणे आणि तरुण पिढीला धारेवर धरणे हे कितपत योग्य आहे या गोष्टींचा या जाणकारांनी वेध घ्यावा असे मला वाटते. नुसतेच आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जे काही घडत आहे ते होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांची ट्रेकिंगसाठी असलेली ‘पिकनिक मेन्टयालीटी’ घालवून त्यांना खऱ्याखुऱ्या ‘ट्रेकर्स मेन्टयालीटीत’ आणण्यासाठी आणि त्यातून खराखुरा निसर्गासक्त गिर्यारोहक घडविण्यासाठी काय करता येऊ शकते याचा विचार करणे जास्त योग्य ठरेल.आपण जे इतके वर्ष ट्रेक्स करून जी सकारात्मक ऊर्जा आत्मसात केलेय, ज्या निसर्गाच्या शाळेत भटकून आपली स्वतःची जडणघडण झालेय ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवण्यापेक्षा आणि उगाचच पूर्वीसारखे खरे गिर्यारोहक राहिले नाहीत अशी आवई उठवण्यापेक्षा सिस्टिम मधील दोष काढून ती बदलविण्यात अश्या लोकांनी पुढाकार घेतल्यास आपली ‘ट्रेकर्स मेन्टयालीटी’ लोकांमध्ये रुजविण्यास नक्कीच मदत होईल. आज अनेक जुन्या आणि नविनही संस्था आहेत ज्या असा बदल घडविण्यासाठी यथार्थपणे या कार्यात हातभार लावत आहेत. संपूर्ण ट्रेकमध्ये दारूबंदी,  कुठेही कुणाला कचरा टाकू न देणे, निसर्गाशी जवळीक साधून या मुलुखातल्या शौर्याची आणि इतिहासाची ओळख करून देऊन येणाऱ्या ट्रेकर्सच्या नवीन पिढीला त्या ठिकाणच्या समाजाशी एकरूप करून घेण्यासाठी पुढाकार घेणे या आणि अशासारख्या बऱ्याच कार्यात योगदान सुरु आहे. आज खरोखर दुदैव म्हणायला लागेल कि महाराष्ट्रात एवढा समृद्ध सह्याद्री असूनही आपल्या इथे ‘पर्यटन’ हवे तितके वाढीस लागले नाहीये. खरं तर या मेक इन इंडिया च्या स्वप्नामध्ये एखादी तरुण पिढी स्वकर्तुत्वानी काही सकारात्मक बदल घडवू इच्छित असेल आणि शाश्वत पर्यटन विकासाला हातभार लावत असेल तर त्यांचे स्वागतच व्हायला हवे अर्थात ते तितकेच नैतिक आणि जबाबदार असणे गरजेचे आहे. या सगळ्यासाठी तितक्याच कळकळीनी आणि जबाबदारीने जर का ते सेवा देऊन शुल्क आकारात असतील तर त्यात काही चूक आहे असही वाटत नाही. मुद्दा चुकीच्या गोष्टींना आळा घालणे आणि खऱ्या अर्थानी गिर्यारोहण हा खेळ आपल्या इथे रुजविणे हाच असू द्यावा. काही बेशरम आणि असंवेदनशील लोकांमुळे गडांवर आणि घाटांमध्ये दारू पिऊन जो नंगा नाच चालवलेला असतो अश्या स्वयं आयोजित ‘पिकनिकी ट्रेकर्सना’ लगाम घालणे हि खरोखर काळाची गरज आहे. किमान हि जागरूकता निर्माण करण्याचे काम जुने जाणते ट्रेकर आणि एखादी योग्य संस्थाच चांगले करू शकते. वेळप्रसंगी एकमेकांसाठी एकत्र येऊन या कामी हातभार लावण्यातच खरं ‘ट्रेकर्सपण’ आहे.  पण अश्या बेफिकीर लोकांच्या जाचाला कंटाळून ‘आम्ही तर आता वीकेंडला ट्रेकिंग करणे सोडलंय’, अशाही प्रतिक्रिया होत्या. असच वागायचं ठरवलं तर एक काळ असा येईल कि गडांवर फक्त ‘पिकनिकवालेच’ दिसतील.  अशा लोकांसाठी सर्वानाच दोषी ठरवून पुन्हा एकदा “च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं ” एवढंच पालुपद म्हणून आणि उगाचच जबाबदारी झटकून हे प्रश्न सुटतील असे वाटत नाही आणि या सगळ्यांना विरोध न करता शांत बसून सह्याद्रीत शांतता नांदेल अशीही शक्यता नाही. गरज आहे ते सर्वांनी एकत्र येऊन बदल घडविण्याची. चांगले लोक गप्पं बसतात म्हणूनच अश्या लोकांचं फोफावतं. कदाचित खऱ्या गिर्यारोहकांनी आपली जबाबदारी न झटकता ती ओळखून एकत्र येऊन व्यक्तिशः किंवा आपापल्या संस्थांमार्फत प्रबोधन करण्याची गरज आहे. नुसते प्रबोधन नाहीच तर जिथे ज्या चुकीच्या गोष्टी होतात तेथे विरोध दर्शविणे हेही तितकेच महत्वाचे ठरेल.     – समीर दिवेकर

Blog

देणाऱ्याने देत जावे !!

  गेल्या दोन अडीच वर्षात Beyond Mountains च्या निरनिराळ्या कार्यक्रमातून खूप लोकांशी जिव्हाळ्याचं नातं जडून गेलं. निसर्गामध्येच नेऊन निसर्गाकडून शिकलेल्या गोष्टी इतरांनी अनुभवाव्यात यासाठी दऱ्याखोऱ्यात फिरून निर्माण होणाऱ्या साहसाचा, धाडसी प्रवृत्तीचा आणि त्यातून मिळणाऱ्या असीम आनंदाचा व्यक्तिगत अनुभव प्रत्येकाला मिळावा या ध्येयानी आमचे प्रत्येक कार्यक्रम घडून येतात. या सगळ्यात निसर्गाकडून, समाजाकडून जेवढं काही घेतलय त्याची संस्थेचा ‘Beyond Yourself’ या उपक्रमातून कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून परतफेड होतच राहते.           काही दिवसांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसातून घरी आल्यावर पुढच्या तिमाही ट्रेकचे आराखडे करण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात माझ्या शाखेतल्या शिक्षकांचा फोन आला. दर वर्षीप्रमाणे यावर्षी भरणारे आपल्या शाखेचे श्रमसंस्कार शिबीर पोमगांव या ठिकाणी होणार आहे अशी माहिती देऊन, गावात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पाणी आडवणाऱ्या बंधाऱ्याची बांधणी व दुरुस्ती, शिवाय त्यासाठी येणारा खर्च, श्रम आणि फलनिष्पत्ती या बाबतची सविस्तर माहिती एका दमात शिक्षकांनी सांगितली. वर पूर्णवेळ शिबिराला उपस्थित राहण्याचाही आग्रह करत होते. माझ्या डोळ्यासमोर काही वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातल्या भादस गावी केलेल्या श्रमदानाची आठवण झाली. कुदळ, फावडी, घमेली घेऊन ३ दिवस आम्ही शाखेतले तरुण उन्हाची पर्वा न करता दुष्काळाशी दोन हात करत गावकऱ्यांसाठी बंधारा उभारण्याच्या कामात राबलो होतो. आज कित्येक दिवसांनी तशीच संधी पुन्हा चालून आली होती पण नेमका मी त्या कालावधीत दुसऱ्या एका कार्यक्रमानिमित्त परगावी असल्याने श्रमसंस्कार शिबीरास उपस्थित राहणं शक्य नव्हतं. हि अडचण सांगितल्यानंतर शिक्षकांनी लगेच दुसरा प्रश्न समोर केला. “तुला जमणार नसेल तर श्रमदानासाठी येणार थोडा खर्च तू उचलशील का? ” असं विचारल्यावर मला एकदम ध्यानात आले. आज खूप दिवस झाले उत्सवा व्यतिरिक्त शाखेत जाणे होत नाही. Beyond Mountains सुरु केल्यापासून तर प्रत्येक शनिवार रविवारही या व्यक्तिगत ध्येयासाठी खर्च पडतो. आणि अश्या कामांसाठी वेळेचं गणित जमत नाही. ज्या शाखेनी आम्हाला घडवलं, समाजाला घडवलं त्याच समाजासाठी श्रमदानाच्या उपक्रमातून काहीतरी निराळं करून दाखवण्याची एक संधी चालून आली होती.             प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येत राहावेत जेव्हा स्वतःला कोणते ना कोणते ऋण फेडण्याची संधी आपण होऊन चालून यावी. जेव्हा कुठल्यातरी गोष्टीसाठी ‘ऋणी’ असणे हि एक जाणीव मनात बनते, या जाणिवेमुळे आपण स्वतः किती व्यक्तिगत लाभात आहोत हे कळून येते. स्वतःमधे दुसऱ्यांबद्दलचा कृतज्ञता भाव मनात जागा राहतो. आपण इथल्या मातीशी, समाजाशी, देशाशी आणि सर्वार्थाने या निसर्गाशी किती घनिष्ठ संबंध ठेऊन आहोत याची आपोआप जाणीव होत राहते आणि नकळात आपले पाय जमिनीवर घट्ट राहतात. आज आपण निरनिराळ्या क्षेत्रात स्वतःच्या कामात कर्तबगारी दाखवून जातो पण ती निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टीमुळे अंतरंगातून जडणघडण होत गेलेय, त्या गोष्टींशी आपण आजन्म ऋणी असणे यातच आपली विनम्रता टिकून राहील. लहानपणापासून पाठीवर पडणारी एखादी थापही नकळत चांगला विचार घडवून जाते आणि विचार घडवणारा तो क्षण आयुष्यभर आपल्या डोक्यात पक्का बसून आपण त्याबद्दल कायमचे कृतज्ञ राहतो. अश्याच एका माणूस घडविण्याच्या फॅक्टरीत मी एके संध्याकाळी दाखल झालो आणि शाळेत असल्यापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंत याच फॅक्टरीत काम करत राहिलो. रोजच्या एक तास शाखेत सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, प्रहार, नियुद्ध, समता यांनी जशी शरीराची घडण झाली तशी पद्य, साहसकथा, बौद्धिके, प्रार्थना यांसारख्या संस्कारानी मनाची घडण पक्की झाली. आज जगात कुठेहि असलो तरी घडून आलेले हे संस्कार दैनंदिन जीवनातही चुणूक दाखवून जातात.आजच्या घडीला व्यक्तिनिर्माण करणारं, व्यवस्थापनाचे चोख धडे देणारं, इथल्या मातीशी निष्ठा जपणारं जगातील उत्कृष्ठ स्रोत म्हणजे संघ शाखाच ठरेल. आज याच शाखेच्या माध्यमातून श्रमदानासाठी अनेक तरुण सरसावले आहेत. उन्हाळ्यात उद्भवणारा पाण्याचा प्रश्न निदान महाराष्ट्राला तरी नवीन नाही. आपल्यापरिनी गावातला पाणीप्रश्न कसा सुटेल यासाठी प्रत्यक्ष मुळाशी जाऊन कामात उतरणे आणि त्यायोगे श्रमसंस्कार घडविणे यासाठी शिबिराचे महत्व चटकन माझ्या ध्यानात आले.   

Blog

Beyond Yourself

  गतवर्षी दसऱ्याला स्थापन झालेल्या Beyond Mountains या संस्थेचा ‘Beyond Yourself ‘ ह्या नवीन प्रकल्पाची सुरुवात या वर्षी २ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली.फक्त नोकरी करत उदरं भरणं एवढेच स्वतः:च्या आयुष्याचे उद्दिष्ट न ठेवता काहीतरी जगावेगळे धाडस करून दाखविण्याची इच्छा मनात बाळगून स्वतःची आवड जपत इतरांनाही या धाडसी मोहिमांत सामावून घेणे या उद्देशाने काही समविचारी मित्रमंडळींचा कट्टा जमून गेला आणि ‘Beyond Mountains’ चा उदय झाला. “All it takes is Courage” या ब्रिदवाक्याला धरून गिर्यारोहणाच्या सोबतीने सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खेळत, अवघड वाटांशी जुळवून घेत, प्रत्येकाला निसर्गनिर्मित आविष्कारांचे दर्शन घडवीत आणि आपल्या सुप्त मनातला मीपणा नष्ट करत, धैर्य, साहस व अनुभव ही सूत्रे वापरून Beyond Mountains ची वाटचाल सुरु आहे.          Beyond Yourself, स्वतःच्या अंत:मनात डोकावून स्वतःच्या पलीकडे जाऊन स्वतःशी संबंधित इतर घटकांच्या कल्याणाचा विचार रुजविणे आणि इथल्या निसर्गाशी आणि समाजाशी जोडलेली नाळ अधिक दृढ करणे या उद्देशाला अनुसरून Beyond Mountains नी उचललेलं हे पहिलं पाऊल. म्हंटलं तर अवघड आणि म्हणलं तर अगदी सोपं. ग्राम शिक्षण , ग्राम आरोग्य, ग्राम विकास आणि ग्राम सुरक्षा या उद्दिष्टांसाठी बांधील असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावामध्ये ‘तोरणा राजगड समाजजोन्नती न्यास’ या सेवा प्रकल्पाला भेट देऊन या वसतिगृहातील पन्नास मुलांशी थेट संवाद साधून मुलांच्याच मदतीने एक अभिनव उपक्रम संपन्न झाला. आपल्या उद्दिष्टांसाठी गेली तीस वर्षे अविरतपणे झटणाऱ्या या संस्थेच्या वाटचालीत खारीचा वाटा उचलण्याची संधी Beyond Mountains ला मिळाली.  

Blog

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Scroll to Top